बारामतीत ऑल इंडिया संपादक संघाचा पत्रकार सन्मान समारंभ उत्साहात


बारामती- ऑल इंडिया संपादक संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात कर्तृत्ववान संपादक व पत्रकारांचा पत्रकार सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कर्तृत्ववान पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातिववस्थेचे निर्मूलन पुस्तक व लेखणी देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास संघाचे जिल्हाध्यक्ष प्रतिक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रभावी नेतृत्व देतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

पत्रकार दिनानिमित्त संपादक तानाजी पाथरकर, शुभम अहिवळे, गौरव अहिवळे, योगेश नालंदे तसेच निखील नाटकर यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेचे सामाजिक दायित्व, सत्यनिष्ठा, निर्भीड लेखन व समाजातील पत्रकारांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. पत्रकारितेने समाजहिताला अग्रक्रम देत लोकशाहीच्या बळकटीसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला संघाचे माजी जिल्हाध्यक्ष भारत तुपे, माजी बारामती तालुका सचिव संतोष पांढरे, माजी इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष सवाणे यांची उपस्थिती लाभली. तसेच पत्रकार व संपादक नानासाहेब साळवे, गणेश जाधव,भालचंद्र महाडिक, विनय दामोदरे, अनिकेत कांबळे, अ‍ॅड. तुषार ओव्हाळ,शेखर गोरे यांच्यासह विविध तालुक्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा महासचिव भीमसेन उबाळे सर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page