दादांच्या स्मृतींना मानवंदना, वहिनींच्या नेतृत्वात स्वच्छतेचा निर्धार अधिक दृढ
बारामती : बारामतीची स्वच्छता ही केवळ मोहीम नसून दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेबांनी जपलेली एक जिवंत भावना आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामती हा दादांचा केवळ संकल्प नव्हता, तर बारामतीवरील त्यांच्या अपार प्रेमाचा तो अमूल्य वारसा आहे. आज आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनीही त्याच विचारांना कृतीची जोड देत, स्वच्छतेच्या माध्यमातून बारामतीच्या विकासाची परंपरा अधिक बळकट करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
बारामती नगर परिषदेच्या वतीने दर शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या “महास्वच्छता अभियानाची” सुरुवात आज सकाळी विद्या प्रतिष्ठान येथे मा. अजितदादा पवार साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर रुई गावठाण येथे श्रमदानाने स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम म्हणजे दादांच्या स्वच्छ, सुंदर, हरित बारामतीच्या स्वप्नाला दिलेली खरी मानवंदना ठरली.
नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या सूचनेनुसार हा महास्वच्छता उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असून, शहर स्वच्छतेबाबत प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत जबाबदारी पार पाडण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण इंगळे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, स्थानिक नगरसेवक संपदा चौधर, विष्णुपंत चौधर तसेच नगरसेवक अमोल कावळे, अल्ताप सय्यद, विशाल हिंगणे, प्रवीण माने, गणेश जोजारे, अनुपिता तांबे, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, आरोग्य अधिकारी यशराज बनसोडे, आरोग्य निरीक्षक स्वरूप अहीवळे, अजय लालबिगे, विजय खरात, अजिनाथ चौधर, पांडुरंग चौधर, मच्छिंद्र चौधर, प्रमोद कांबळे, नवनाथ चौधर,सुरज देवकाते आणि नगरपरिषद कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादांचे स्वप्न, वहिनींचा निर्धार आणि बारामतीकरांचा उत्स्फूर्त सहभाग या बळावर स्वच्छ, सुंदर, हरित बारामतीचा प्रवास अखंड सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“स्वच्छता ही दादांनी दिलेली संस्कृती आहे. महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बारामती अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा उपक्रम दादांच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे.”- सचिन सातव,नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद
“स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वच्छ, निरोगी आणि सुंदर बारामती घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”- नवनाथ बल्लाळ (आरोग्य सभापती, बारामती नगर परिषद)






