बारामती : ज्ञानगंगा सेवाभावी संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने “विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण सोहळा”नुकताच बारामती नगर परिषद शाळा क्र. ३ येथे (ता.१९)उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्यासाठी वह्या,पुस्तके व इतर शालेय साहित्यांचे तसेच सर्व मुलांना खाऊ (फळे व बिस्कीट)वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती),गणेश शिंदे (तहसीलदार,बारामती),वैभव नावडकर (प्रांत अधिकारी, बारामती),तसेच पोपट नाना धवडे(माहिती अधिकार, कार्यकर्ता) व सोमनाथ भिले अध्यक्ष-बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ)तसेच सरपंच अजित बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप करण्यात आले.
ज्ञानगंगा सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष युवराज पोटे, सचिव योगेश नाळे,कार्याध्यक्ष अमोल यादव,महिला अध्यक्षा ॲड.माया खुंटे-पाळेकर,महिला उपाध्यक्षा रुपाली लोणकर कायदेशीर सल्लागार ॲड.अजित बनसोडे,ॲड.अनिकेत ननावरे, ॲड.सागर वाळके आदी मान्यवरांनी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. छोट्या छोट्या मुलांच्या हाती वह्या आणि पुस्तके पोहोचल्याने पालक आणि शिक्षकवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
ज्ञानगंगा सेवाभावी संस्था गेली तीन वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवत आहे.”ज्ञान,प्रशिक्षण, संघटन आणि लढा” या संस्थेच्या घोषवाक्यानुसार शैक्षणिक क्षेत्रात मदतीचा हात देण्याचे काम संस्था करीत असून, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा आधार मिळत आहे.
“जे जे आपणांसी ठावे,ते इतरांसी सांगावे”या उक्तीप्रमाणे शालेय साहित्य वाटपाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची ओढ निर्माण व्हावी आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, हा संस्थेचा उद्देश आहे.






