बारामती : बारामती शहरातील दलित वस्ती आमराई येथील विकास कामांचे भूमिपूजन,उद्घाटन किंवा निवडणुकीचा प्रचार असेल तर नेत्यांना आठवण होते का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
इतर वेळेस ना नेता येतो ना त्यांचा कार्यकर्ता अशी परिस्थिती आहे.लोकांना स्वतः अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते.
विकासकामांचे एकदा भूमिपूजन झाले की उद्घाटन करण्यासाठी नेते हजर होतात.इतर वेळी काम कशा पद्धतीने सुरू आहे याकडे लक्ष दिले जात नाही.
दलित वस्तीचे अनेक प्रश्न आज देखील प्रलंबित आहेत.अतिक्रमण नियमित केले असते तर लोकांना घरकुल मिळाले असते. हक्काचे घर असते.
परंतु तसे न होता प्रचार करताना विकास सांगितला जाईल.लोकांनी विचार करणे गरजेचे आहे नक्की विकास कशाला म्हणायचं? आमराई मधील मते चालतात पण येथील स्थानिक लोकांना रेड झोन आहे सांगुन कर्ज दिली जात नाही.त्यामुळे येथील युवा वर्गाला व्यवसाय करण्यासाठी चालना/आर्थिक सहाय्य मिळत नाही.यावर नेते मंडळी कधी बोलत नाही.समाज मंदिर, व्यायाम शाळा, सार्वजनिक शौचालय बांधून दिली की झाला विकास.या कामांचा डागडुजी,स्वच्छतेचा प्रश्न आज देखील सुटलेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार दलित वस्ती आमराई येथे येतील.आणि विकासावर भाषणे देतील माहिती देतील परंतु यावेळी लोक भावनिक न होता भविष्याचा विचार करून निर्णय घेतील जेणेकरून आज पर्यंत विकासाच्या प्रवाहात न आलेला भाग येत्या पाच वर्षात कमीत कमी विकासाच्या प्रवाहात सामील तरी होईल? असे नागरिकांमधून बोलले जात आहे.






