बारामती: टीपू सुलतान जयंती आणि विचारांचा जागर
बारामतीमधील टिपूप्रेमी तरुणांकडून या महान स्वातंत्र्यसेनानीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आणि विधायक कार्य करण्याची ओढ यातून एकत्र येत इतिहासातल्या हे महान व्यक्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रा. फिरोज मुलाणी यांनी याविषयी विचार व्यक्त केले. टिपू सुलतान यांचे आदर्श राजा म्हणून आपल्या प्रजेविषयीचे प्रेम,त्यांच्या सुखदुःखाची जाणीव ठेवत केलेला राज्यकारभार,त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केलेल्या उपाययोजना , जसे की,शेतीवरील कर आकारणीत मध्यस्थांची हकालपट्टी, कृषीऋण योजना, बँक व्यवस्था, व्यापाराला प्रोत्साहन, देशविदेशात त्यासाठी काढलेले आउटलेट.
अफाट ग्रंथप्रेम, आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास आणि ‘म्हैसूर रॉकेट ‘ या जगद्विख्यात प्रणालीचा शोध आणि ब्रिटिशाविरुद्ध यशस्वी वापर यांसारख्या अतुलनीय आणि काळाच्या पुढच्या गोष्टींनी त्यांचे वेगळे व्यक्तित्व तरुणांना उलगडले.
याचबरोबर राज्याच्या बहुधर्मीय प्रजेची काळजी घेणारा प्रजावत्सल राजा हे रूपही समोर आले. फारसी, कन्नड, ऊर्दू, मराठी अशा अनेक भाषांचा जाणकार आणि सर्व धर्मियांना समान वागणूक देण्याचा आपले पिता हैदर अलिंचा वारसा खंबीरपणे चालविणारा राजा म्हणूनही त्यांचे माहात्म्य लोकांना पटले.
वेगवेगळ्या हिंदू देवस्थानाना उदारहस्ते दान देणारा,पेशव्यांच्या आक्रमणाने उध्वस्त शृंगेरी मठ पुन्हा उभारून देत शंकराचार्यांना सहाय्य करणारा, अखेरच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांचा कडवा प्रतिकार करणारा आणि आपल्या मातृभुमिवर जीव ओवाळून टाकणारा राजा तरुणांना भावला आणि भारताची ‘ सामासिक संस्कृती ‘ ची महत्ताही पटली.





