बारामती नगरपरिषदेसमोर मुस्लीम समाजाचं ‘हलगी नाद’ आंदोलन


बारामती : शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत बारामती नगरपरिषदेसमोर ‘हलगी नाद’ आंदोलन करणार आहेत. भारतीय राष्ट्रवादी मुस्लिम समाजाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या.
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही बारामती शहरातील मुस्लिम समाजाची स्थिती दयनीय असल्याचं सांगत, त्यांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने दफनभूमीशी संबंधित काही मुद्दे आहेत. ‘आम मुस्लिम कब्रस्तान’ मधील मातीचा कस संपला असल्याने ती तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, दफनभूमीत बांधलेल्या पक्क्या कबरी हटवून जागा उपलब्ध करून देण्याची आणि गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन दफनभूमीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, शैक्षणिक आणि आर्थिक गरजांवरही लक्ष वेधण्यात आले. शहनशहा दर्गा मस्जिद येथील अपूर्ण असलेले अल्पसंख्याक बहुउद्देशीय इमारत (शादीखाना) तातडीने पूर्ण करून समाजाला देण्याची मागणी केली आहे. तसेच, नगरपरिषद मालकीच्या उर्दू शाळा क्र. ३ आणि ४ यांची दुरवस्था झाली असून, त्या ठिकाणी आधुनिक संगणक आणि कौशल्य विकास केंद्रे उभारून बेरोजगारांना रोजगार देण्यास प्रोत्साहन द्यावे, असं निवेदनात म्हटलं आहे.
या आंदोलनात मुस्लिम महिलांसाठी घरगुती उद्योगांचे प्रशिक्षण देऊन विक्री केंद्रे उभारणे, मुस्लिम बहुल भागांमध्ये रस्ते, ड्रेनेज, वीज, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पारंपारिक व्यापारासाठी ‘व्यापार ठाणे’ (हब) निर्माण करणे आणि शेतकऱ्यांचे शेतीपूरक उत्पादन साठवणुकीची घरे (गोदामे) बांधण्यासाठी जागा व अनुदान उपलब्ध करून देणे या मागण्यांचाही समावेश आहे.
मोईन बागवान, फिरोज (मुन्ना) बागवान, महंमद शेख, अस्लम तांबोळी, मुफ्ती शोएब बागवान, जावेद शेख, समीर बागवान, अशापक बागवान, असिफ बागवान, जमीर सय्यद, अरबाज बागवान, मोहसीन बागवान, साजिद बागवान, रिजवान खान, जिशान बागवान, हैय्युम बागवान, मुनिर तांबोळी, जहांगीर तांबोळी, शोएब सय्यद, सुलतान शेख, आझर पठाण, अफसर बागवान, नूरमोहम्मद शेख, जावेद मण्यार यांनी या मागण्या केल्या असून या मागण्यांकडे नगरपरिषद प्रशासन कसं लक्ष देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page