बारामती तालुका पोलीस स्टेशन यांचे मार्फत जागतिक महिला दिन साजरा


बारामती : जागतिक महिला दिनानिमित्त बारामती तालुका पोलीस स्टेशन यांचे मार्फत जागतिक महिला दिन दिनांक ११/०३/२०२५ रोजी साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर महिला आणि मुलींसाठी कायदेविषयक व स्व- सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संगीत खुर्चीच्या खेळाने करण्यात आली. पोलीस स्टेशन म्हटले की महिला घाबरतात. संगीत खुर्चीच्या कार्यक्रमामुळे महिला आणि मुलींचे दडपण कमी होऊन त्या आनंदाने समरसतेने कार्यक्रमात एकरूप झाल्या.
कायदेविषयक मार्गदर्शन करत असताना सोशल नेटवर्किंग, फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यामुळे होणारी गुन्हेगारी, याद्वारे होणाऱ्या ओळखींमुळे, मैत्रीमुळे होणारी गुन्हेगारी, फसवणूक यांविषयी उत्तम मार्गदर्शन करण्यात आले गुन्हे होऊ नयेत किंवा अशा प्रकारे कुठल्या महिला मुलींना त्रास होऊ नये म्हणून कशाप्रकारे काळजी घेतली जावी याविषयी म.पो.हवालदार आशा शिरतोडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
मोबाईल मुळे आणि सोशल मिडिया मुळे नात्यांवर परिणाम होत असून आई आणि मुली मध्ये संवाद वाढविण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या आणि दिशा अकॅडमी च्या जनसंपर्क अधिकारी झरीना खान यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
महिला सगळ्यांची काळजी घेतात मात्र स्वतःची काळजी त्या घेत नाहीत हे सांगत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर जळक मॅडम यांनी महिला आणि मुलींना आहार विषयक मार्गदर्शन केले.चुकीच्या आहारामुळे अनेक आजारांना आपण बळी पडत असतो. गर्भाशयाचा कॅन्सर, मासिक पाळीचा वाढता त्रास आणि आहार, रोजची दिनचर्या यांचा संबंध स्पष्ट करत त्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि त्यासाठी आहार कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
मुलींनी स्वसंरक्षणासाठी, शारीरिक सशक्त होणे किती गरजेचे आहे हे नमूद करत मुलींनी खेळ खेळणे, कराटे शिकणे का आवश्यक आहे या विषयी म.पो.शि.मिनल ओहोळ यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात दिशा अकॅडमी, बारामती मधील मुलींनी विशेष सहभाग घेतला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या दिशा अकॅडमी मधील मुलींना कायदेविषयक आणि आरोग्य विषयक माहिती मिळाली.
पो.नि. मा. वैशाली पाटील यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन केले.
पो.उप.नि.धनश्री भगत आणि पो.उप.नि. सुवर्णा गायकवाड यांनी महिला आणि दिशा अकॅडमी तील मुलींना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page