बारामती नगर परिषदेचे नागरिकांना जाहिर आवाहन


बारामती : बारामती नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, बारामती शहरात डेंगी, चिकुनगुण्या इत्यादी साथ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कार्यवाही सुरु केली आहे. चिकुनगुण्या, डेंग्यु ताप या रोगाचा प्रसार दुषित “एडिस इंजिप्ती” डास चावल्यामुळे होतो, हे डास व डास निर्मितीच्या लारवा साठा करून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. विषाणुमुळे होणारा हा आजार आहे. याकरीता शहरातील सर्व नागरिकांनी चिकुनगुण्या, डेंग्यु ताप याबाबत घरगुती उपाययोजना व दक्षता घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या *दर गुरुवारी “कोरडा दिवस”* पाळान्यासाठी आवाहन करण्यात येत आहे .

*सदर दिवशी नगर परिषदेचा पाणी पुरवठा बंद राहील. तरी आपल्या घरातील सर्व पाणी साठवणूकीची भांडी मोकळी करुन कोरडी करावीत व दुस-या दिवशी भरावीत.
*याची सुरुवात गुरुवार, दिनांक 29/०९/२०१2 रोजी होईल.*

तसेच नागरिकांनी घरातील पाणी साठ्याच्या टाक्या, फ्रीज, कुलर, कुंड्या इत्यादी मधील पाणी दर ७ दिवसांनी बदलावे. घराभोवती पाणी साठणा-या टाकावू वस्तु, पत्र्यांचे डबे, नारळांच्या करवंट्या, रिकामे शहाळे, फुटक्या बाटल्या, फुटक्या वापरात नसणा-या बॅट-या, खड्डे इत्यादी डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. गच्चीवरील व जमिनीवरील पाण्यांच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावावित. त्यामध्ये फट राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवावा. या विषयी शहरात नगर परिषदेमार्फत जनजागृती करण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किटकनाशक फवारणी, धुरळणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, दक्षता घेणेविषयीची पत्रके वाटण्‍याची कार्यवाही चालू आहे.

तथापि, याबाबत नागरिकांनी घरगुती उपाय योजना म्‍हणून व डासांपासून व्‍यक्‍तींगत संरक्षणासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे, डास प्रतिबंधक अगरबत्‍ती, मलम तसेच मच्‍छरदाण्‍यांचा वापर करावा. शरीर उघडे राहणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
                  तसेच जलजन्‍य आजार टाळण्‍यासाठी पिण्‍याचे पाणी गाळुन व उकळुन पिण्‍यासाठी वापरावे. मिळकतीमधील सांडपाण्‍याचे पाईप, पाणी पुरवठ्याचे पाईप इत्‍यादींची गळती तात्‍काळ दुरुस्‍ती करुन गळत्‍या बंद कराव्‍यात. वरील उपायायोजना व दक्षता घेणेबाबत नागरिकांनी वरीलप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेमार्फत करण्‍यात येत  आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page