बारामती : विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. असे मत अशोक लोंढे यांनी व्यक्त केले आणि याची सुरुवात स्वतः पासून करीत बारामतीतील अशोक किसन लोंढे यांनी आपल्या नवीन मोटारीची पूजा विधवा महिलांकडून करून घेत एक नवीन आदर्श निर्माण केला. जुन्या अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा यांना मूठमाती द्यायचे काम अशोक लोंढे यांनी केले असून, त्यांच्या या निर्णयाचे कौतुक बारामतीकर करीत आहेत. प्रत्येक स्त्रीला मानसन्मान मिळालाच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे.

आज बहुतांश ठिकाणी विधवा असल्यामुळे महिलांना हळदी- कुंकू किंवा कपाळी गंध-टिकली लावायची नाही, नवीन साडी-चोळी व बांगड्या असे अलंकार घालायचे नाहीत, शुभकार्यामध्ये सहभागी व्हायचे नाही, असा रिवाज पाडला आहे. या रीति रिवाजाला लोंढे यांनी मूठमाती देण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी उपस्थिती दर्शवत त्यांच्या हस्ते विधवा महिलांना साडी- चोळीचा मान देऊन सन्मान करण्यात आला. व नवीन गाडीची पुजन देखील या महिलांच्या हस्ते झाले.






