काऱ्हाटी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सदस्य व ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा..


प्रतिनिधी : गणेश थोरात

काऱ्हाटी : ग्रामपंचायत मौजे काऱ्हाटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे दिनांक २०/०२/२०२६ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेसाठी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. दिपाली योगेश लोणकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. निलेश धारकर, उपसरपंच सौ. प्रमिला किशोर सोनवणे त्याचबरोबर सर्व सदस्य हजर होते.२६ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये कोरम पूर्ण असूनही ग्रामसभा होऊ शकली नाही, याचे कारण ग्रामपंचायत अधिकारी निलेश धारकर हे त्यावेळेस रजेवर होते.रजेवर जाताना ते ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर असणाऱ्या कपाटाच्या चाव्या सोबत घेऊन गेले होते. त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी श्री. खोमणे यांना दप्तर ग्रामसभेपुढे सादर करता आले नाही. वास्तविक पाहता ग्रामपंचयात अधिकारी रजेवर जाताना त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नसताना ते कपाटाच्या चाव्या घेऊन गेले आणि त्यांची पाठराखण सरपंच यांनी केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतच्या आर्थिक कारभारामध्ये फार मोठी अनियमितता आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
परंतु सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी त्यास दाद देत नाहीत. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निविदा काढल्या जातात, विविध प्रकारच्या कामांची बिले काढली जातात, काही ठिकाणी तर काम नसतानाही ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी बिले काढलेली आहेत. असा आरोप ग्रामस्थ यांनी केला होता. याच अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेसाठी नागरिकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. ग्रामस्थांनी आपापल्या भागात पंधरावा वित्त आयोग मधून केलेल्या कामांची माहिती आणि त्या संदर्भात काढलेली बिले याबाबत माहिती विचारली असता संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. वॉर्ड क्रमांक 3 येथील वाकी वस्ती व साळुंकी वस्ती येथील वस्तीवरील मंजूर काम न करता त्याचे 75 हजार रुपये परस्पर अदा केलेले आहेत. याचा जाब संबंधित भागातील नागरिकांनी विचारला असता काम न करता परस्पर देयक (बिल) काढल्याचे सांगितले. असल्याचे नागरिकांनी सांगितले.तसेच अटल भूजल योजना मधून मिळालेल्या बक्षिसाच्या दीड कोटी रुपये रकमेतून पाच बंधारे कामे देताना संबंधित सदस्य किंवा ग्रामस्थ यांना विश्वासात घेतलेले नाही. रुपये दहा लाख वरील कामे देताना इ निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक असताना संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी जाणीवपूर्वक बी 1 निविदा प्रक्रिया राबवली असून आपल्या मर्जीतील ठेकेदार यांना काम संगणमताने देण्याचा निर्णय घेतला असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.तसेच चालू असणाऱ्या कामाचा दर्जा ही संबंधित ठेकेदार यांच्याकडून व्यवस्थित राखला गेला नाही, याचाही जाब संबंधित अधिकारी यांना ग्रामस्थांनी विचारला. गावातील चौका चौकात कचराकुंड्या बसवणे, प्राथमिक शाळा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सॅनेटरी नॅपकिन मशीन देणे, साळुंखे वस्ती येथील पाईप लाईन काम न करता त्याचे देयक (बिल)अदा करणे, या सर्व गोष्टी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. निलेश धारकर यांनी परस्पर संगनमताने केलेल्या आहेत, असे ग्रामसभेला दिसून आले. ग्रामसभेत नागरिकांच्या कुठल्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर न देता सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शेवटचा पर्याय म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले नाही. सदर प्रकरणावरून दिसून येते की गावामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनेचा निधी परस्पर खर्च करून त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे? याची चौकशी करण्यात यावी. याबाबत नऊ सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती बारामती यांना रीतसर लेखी तक्रारी अर्ज देऊन सदर बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. प्रशासनाच्या वतीने यावर योग्य प्रकारे दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा सदस्य आणि ग्रामस्थांनी दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page