बारामती : साठे नगर, कसबा येथील ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या मुख्य प्रवेशद्वारावरील अक्षरांची दुरवस्था झाली असून, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते केदार देवानंद पाटोळे यांनी केला आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, साठे नगर परिसराची ओळख असलेल्या या प्रवेशद्वारावरील अक्षरे निखळली असून काही अक्षरे तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे महापुरुषाच्या नावाने असलेल्या या प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण होत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासकीय दिरंगाईचा पाढा
या गंभीर विषयाची दखल घेत केदार देवानंद पाटोळे यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाद्वारे प्रवेशद्वाराच्या अक्षरांची तातडीने दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रार देऊन महिना उलटून गेला तरी अद्याप नगरपरिषद प्रशासनाकडून साधी दखलही घेण्यात आलेली नाही.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराची अशी दुरवस्था होणे ही खेदजनक बाब आहे. वारंवार विनंती करूनही जर प्रशासन जागे होत नसेल, तर हे आमच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे.”
नगरपरिषदेने येत्या काही दिवसांत या अक्षरांची दुरुस्ती न केल्यास, साठे नगरमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी केदार पाटोळे यांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






