पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे रखडलेल्या SRA प्रकल्पांविरोधात आणि पात्र-अपात्र झोपडपट्टीधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SRA कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात हजारो झोपडपट्टीधारकांचा सहभाग होता. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत ५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे विकासक बदलणे आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करणे यावर प्रशासनाने तातडीची कारवाई करण्यास संमती दर्शविली.
तसेच मुंबईच्या धर्तीवर पात्र आणि अपात्र अशा सर्व झोपडपट्टीधारकांना दरमहा ₹१५,००० घरभाडे देण्यात यावे, या मागणीवरही अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. अपात्र ठरविलेल्या सर्व प्रकरणांची पुनःसुनावणी करून पात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात सर्वांना ५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे दर्जेदार घर देण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चाला संबोधित करताना आद. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले,
“तुम्ही जर ५०० च्या भानगडीत न अडकता एकत्र राहिलात, तर ५०० स्क्वेअर फूट घराचा निर्णय लवकरच शक्य आहे. पण त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे.”
मोर्चाचे नियोजन अॅड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. अनिल अण्णा जाधव, आणि अॅड. सर्वजीत बनसोडे यांनी केले होते. पिंपरी-चिंचवड परिसरात मोर्चाची तयारी करण्यासाठी अॅड. सर्वजीत बनसोडे यांनी अनेक बैठका घेतल्या आणि जनसंपर्क मोहिमा राबवल्या.
शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियदर्शी तेलंग, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. सर्वजीत बनसोडे, डॉ. अनिल जाधव, पुणे व पिंपरी चिंचवड VBA अध्यक्ष अॅड. अरविंद तायडे, संजीवन कांबळे, वसंतदादा साळवे, प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, महासचिव अरुण कांबळे, महिला अध्यक्ष अनिताताई चव्हाण, शारदाताई बनसोडे, पुणे शहर युवक अध्यक्ष सागर आल्हाट, आणि पुणे जिल्हा पूर्व युवक अध्यक्ष मंगलदास निकाळजे उपस्थित होते.
शिष्टमंडळाने SRA अधिकाऱ्यांना आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर केले, त्यानंतर आद. बाळासाहेब आंबेडकर यांनी मोर्चातील उत्स्फूर्त गर्दीला संबोधित केले.
मोर्चाचा समारोप संजीवन कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.






