बारामती (प्रतिनिधी) — सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक घेण्याच्या प्रक्रिया चालू करण्यात येत आहे. यामध्ये महत्वाचे प्रभाग रचना तयार करत असताना प्रस्थापित राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन प्रभाग रचना बेकायदेशीरपणे करण्यात येतात व विरोधक निवडून येणार नाही याची दक्षता घेतात नैसर्गिक परी सीमांचे पालन केले जात नाही, प्रभाग रचना फोडली जातात, ज्या समुदायाचा प्रभाग आहे त्या समुदायाचा प्रभाग न ठेवता इतर समुदाय त्यामध्ये जोडला जातो, प्रभागांमध्ये मतदारांची एकसारखी संख्या ठेवली जात नाही, नदी, रस्ते, रेल्वे लाईन, ओढे , नाले यांना क्रॉस करून प्रभाग बनवले जातात त्यामुळे बारामती शहर व तालुक्यात नव्याने करण्यात येणाऱ्या प्रभाग रचने मध्ये कायदेशीरपणे व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या आधारे प्रभाग रचना करण्यासाठी व बेकायदेशीर प्रभाग रचनेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज सर्व पक्षीय बैठक पाठबंधारे गेस्ट हाऊस येथे पार पडली. यावेळी उपस्थित सर्व पक्षांनी एकमुखाने या चुकीच्या प्रभाग रचनेला तीव्र विरोध करत तक्रार/हरकत दाखल करण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत प्रभाग रचना ही लोकप्रतिनिधींच्या सोयीसाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी असावी, असे स्पष्ट करत सद्य:स्थितीत रचण्यात आलेले प्रभाग हे अन्यायकारक व पक्षपाती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे जुनी रचना तत्काळ रद्द करून नव्याने न्याय्य पद्धतीने प्रभाग रचना करावी, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीतीही ठरवण्यात आली. त्यानुसार —
नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम
विविध प्रभागांमध्ये बैठका व सभा घेणे
पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणे
निवेदनाद्वारे प्रशासकीय पातळीवर हरकत नोंदवणे
आवश्यकतेनुसार न्यायालयात याचिका दाखल करणे
या सर्व टप्प्यांवर एकसंघपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ॲड.संदीप विनोदकुमार गुजर , सत्यव्रत अर्जुनराव काळे, मनसेचे ॲड.सुधीर पाटसकर, ॲड.पोपटराव सूर्यवंशी, ॲड.श्री एस.एन. बापू जगताप शरदचंद्र पवार गट, ॲड.निलेश वाबळे,मनसे, बसपाचे काळूराम चौधरी, वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, शिवसेना (ठाकरे गट) ऍड. राहुल शिंदे, आरपीआयचे राजेंद्र सोनवणे, संजय वाघमारे, एम आय एम पक्षाचे फैय्याज शेख, बीजेपी पक्षाचे ॲड नितीन भामे, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते,यशपाल भोसले, काँग्रेस पक्षाचे वीरधवल गाडे, रासप पक्षाचे ॲड.अमोल सातकर, शिवसेना शिंदे गटाचे सुरेंद्र जेवरे, आदी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीसंदर्भात होत असलेली ही एकतर्फी कारवाई थांबवण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेतृत्वाने व्यक्त केला आहे.






