मुंबई : शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की काही व्यक्ती/संस्था काही कारणास्तव आत्मदहन / आत्महत्या किंवा यासारखे इतर प्रकारचे पत्र देतात. परंतु पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याची योग्य वेळीच दखल न घेतल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू शकतो. याकरिता संबधित सहाय्यक आयुक्त/ प्रादेशिक उपायुक्त / आयुक्त / महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक यांनी वैयक्तिकरित्या अशा पत्रांची वेळीच दखल घ्यावी. अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाल्यानंतर तात्काळ दखल घेण्याचे महाराष्ट्र शासनाने दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी परिपत्रकात आदेश दिले आहेत.अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाल्यानंतर तात्काळ खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :-

१. संबधित सर्व पोलिस ठाण्याला योग्य प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी पत्र द्यावे. तसेच आत्मदहन / आत्महत्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यापासून २४ तासांच्या आत संबंधित पोलिस आयुक्त / पोलिस उपायुक्त/पोलिस निरिक्षक / पोलिस उपनिरिक्षक/पोलिस ठाणे या कार्यालयांना लेखी कळवावे.
२. संबंधित कार्यालयाच्या अवती-भोवती योग्य खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवावा.

३. ज्या कारणांसाठी अशी पावले उचललेली आहेत, त्या सर्व मुद्यांची योग्य शहानिशा करून शासनाची / कार्यालयाची बाजू संबधितांना लेखी कळवावी. आवश्यकता असेल तर त्यांची सुनावणी घेऊन जर त्यांची मागणी शासन निर्णयात / परिपत्रकात / कायदा / नियमात बसत असेल तर पूर्ण करावी किंवा बसत नसेल तर संबंधितांना लेखी पत्राद्वारे तसे कळवावे आणि त्यांना आत्महत्या / आत्मदहन करण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करावे. जर प्रयत्न करुनसुध्दा आत्महत्या/ आत्मदहनापासून परावृत्त होत नसतील तर त्यांच्या विरुध्द पोलिसांमार्फत योग्य प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल शासनास / आयुक्त कार्यालय यांना लगेच कळवावा, तसेच याबाबतचा अहवाल गृह विभागाससुध्दा पाठवावा.

२. जर अशा प्रकारचा पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयाशी संबंधित असेल तर आयुक्त यांनी वरीलप्रमाणे योग्य खबरदारी घ्यावी. तसेच जर असा पत्रव्यवहार मंत्रालयाशी संबंधित असेल तर यासाठी सह सचिव / उप सचिव हे नोडल अधिकारी म्हणून योग्य खबरदारी आणि उपाययोजना करतील आणि मंत्रालयाचे सुरक्षा अधिकारी यांना लेखी कळवतील आणि त्यांच्या संपर्कात राहून योग्य प्रतिबंधात्मक / आवश्यक उपाययोजना करतील आणि काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतील. तसेच त्याबाबतचा अहवाल सचिव / प्रधान सचिव/ अ.मु.स. (पदुम) यांना तात्काळ सादर करतील.

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२१/२३५/प्र.क्र.०८/पदुम-१७
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२१०९२४१६२६११६२०१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.







