बारामती : बारामती शहरात अनेक वर्षापासून पथविक्रेते व्यवसाय करीत आहेत.अद्याप पर्यंत अनेक पथ विक्रेते यांची नगर पालिकेकडे नोंदणी झालेली नाही.सदर पथविक्रेते यांच्यावर बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कारवाईचा सपाटा चालू केल्यामुळे पथ विक्रेते यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती एम.आय.डी.सी.रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणारे पथ विक्रेत्यांना सुशोभिकरण केल्यामुळे व्यवसाय करण्यास एक प्रकारे बंदीच घातली आहे.सुशोभिकरण केले पाहिजे पण जनतेच्या पोटावर पाय देऊन नाही.असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पथ विक्रेत्यांवरती अतिक्रमणची सुरू असलेल्या कारवाईचे कारण अद्याप समजलेले नाही फक्त एवढीच चर्चा आहे की वरून आदेश आला आहे. त्यामुळे नेमका आदेश नेत्याचा आहे का असे बोलले जात आहे.त्यामुळे बारामती शहरातील पथविक्रेत्यांची ॲलर्जी नेमकी नेत्याला कि प्रशासनाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्यवसाय करून पोट भरणारे नागरिकांवर सुशोभिकरण मुळे उपासमारीची वेळ येत असेल तर असा विकास आम्हाला नको म्हणण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे.
उपमुख्यमंत्री यांनी रस्त्याच्या बाजूला सुशोभीकरणात दुकाने उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामधून मिळणाऱ्या करातून सुशोभीकरणाची देखभाल करणार आहेत. त्याच ठिकाणी व्यवसाय करणारे पथ विक्रेते हे देखील नगरपालिकेला कर देत होते आणि आज देखील देण्यास तयार आहेत.तरी देखील पथ विक्रेत्यांचा विचार या ठिकाणी केलेला नाही. सदर बांधलेले दुकाने घेण्यासाठी पथ विक्रेत्यांचे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पथविक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.
शहरामध्ये अनेक बांधकामे अनधिकृत असताना फक्त पथ विक्रेत्यांवरती कारवाई का? बारामती एमआयडीसी रोड लगत पत्र्याचे शेड आहेत. सदर पत्रा शेडला नगरपालिकेची परवानगी आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे. जर परवानगी नसेल तर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.