उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन


पुणे, दि. १: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथून उद्धाटन करण्यात आले.

यावेळी यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्य विषयक मदत मिळावी म्हणून आजपासून राज्यभर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कक्षामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होईल.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
दुर्धर आजारावरील उपचाराकरीता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खोली क्रमांक १० तळमजला, जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षासाठी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय कक्षामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक योजनांचे माहितीफलक लावण्यात आले आहेत. या कक्षाला भेट देणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची कक्षाला भेट
उद्घाटन कार्यक्रमानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी त्यांचे स्वागत केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page